हायलाइट्स:
- जळगावहून पुण्याला निघालेल्या मामाच्या कारला अपघात
- अपघातात दोन जण जागीच ठार, तिघे जखमी
- जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
रावेरमधून कोलते व सांगेले कुटुंबीय पुण्याला निघाले होते. औरंगाबाद-पुणे महामार्गावरून जात असताना रविवारी पहाटे नेवासा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. नेवासा फाटा येथील चौकात नव्याने गतिरोधक बसवण्यात आला आहे. त्याचा अंदाज न आल्याने जवळ आल्यावर वाहने अचानक थांबवली जातात. अशाच पद्धतीने अचानक थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार धडकली. यामध्ये कारचा पुढील भाग चेपला गेला.
अपघातात कारमधील गजेंद्र रुपचंद कोलते (वय ६५ रा. वाघोदे, ता.रावेर जिल्हा जळगाव) व आकाश प्रकाश सांगेले (वय २८ रा. थोरगव्हाण, ता.रावेर, जि.जळगाव) हे जागीच ठार झाले. तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय ३५), भूमिका कल्पेश पाटील (वय ६, रा वलसाड, गुजरात) व सुलभा गजेंद्र कोलते (वय ५५) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघाताला निमंत्रण ठरणाऱ्या गतिरोधकाजवळ पांढरे पट्टे मारावेत, सूचना फलक लावावेत, अशा सूचना पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसंच कंटेनरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.