आगामी निवडणुकीचे वातावरण पाहता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे आणि करून दाखवलेचे होर्डिंग्ज शहरभरात लावले आहेत. ज्यात नांदेड-मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरणास मिळालेली मान्यता आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जालन्यातून पहिली किसान रेल्वे सुरू केल्याच्या उल्लेख केला गेला आहे. तर या होर्डिंगवरून आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रेल्वे सुरू झाल्याचं मी अभिनंदन करतो, पण श्रेय कुणी घेऊ नयेत असा टोला खैरे यांनी दानवे यांना यावेळी लगावला. तुम्ही रेल्वे सुरू केली तर काय झालं तुम्ही रेल्वे मंत्री आहेत,त्यामुळे हे करावेच लागेल. पण याचा अर्थ असा होत नाही की होर्डिंग बाजी केली पाहिजे. मुळात भाजपच काहीच काम नसून हे फक्त चमकोगिरी सुरू असून, मी स्वतः अनेकदा मराठवाड्यातील रेल्वेबाबत संसदेत अनेकदा आवाज उठवला असल्याचं खैरे म्हणाले.
त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप-शिवसेना कामाला लागली आहे हे यातून स्पष्ट होत आहे.