हायलाइट्स:
- रत्नागिरीत धक्कादायक प्रकार आला समोर
- राष्ट्रीयकृत बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
- माजी अधिकाऱ्यासह मध्यस्थी आणि कर्जदार अशा २३ जणांविरोधात गुन्हा
- रत्नागिरी शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या सगळ्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रे संशयास्पद व बनावट असल्याचे युनियन बँकेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. संशयित कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मध्यस्थांसह एकूण २३ जणांवर रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह रत्नागिरी तालुक्यातील दोन मध्यस्थ व एकूण वीस कर्जदारांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, रत्नागिरी शहर पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
युनियन बँकेचे विरेश चंद्रशेखर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. २०१५-२०१६ या कालावधीत एकूण वीस कर्जदारांनी कर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे (७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / बनावट मुखत्यारपत्र ) कर्ज मागणी अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती संशयास्पद आणि बनावट असल्याचे समोर आले. या कर्जदारांच्या कर्ज मंजुरीकरिता दोन जणांनी मध्यस्थी केली होती. हे दोघे भाटीमिऱ्या, मांडवी झाडगाव रत्नागिरी येथील आहेत. तत्कालीन शाखा व्यवस्थापक, कर्जदार, मध्यस्थी यांनी संगनमत करून युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बँकेकडून आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजूर करून घेतले. यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेतले. त्या मंजूर रक्कमेचा आंबा पिकपाणीकरीता वापर न करता, वैयक्तिक खर्चासाठी वापर करुन त्या रकमेची परतफेड केलेली नाही.
श्वास रोखून धरायला लावणारा विचित्र अपघात; ट्रक कठडा तोडून लोंबकळत राहिला
संबंधित एकूण वीस कर्जदार हे घेतलेले कर्ज फेड करू शकतात अगर कसे? याबाबत कोणतीही शहानिशा न करता तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी बँकेकडून कर्ज मंजूर करुन दिले व आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. कर्जापोटी बँकेची तब्बल ५ कोटी १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात बँकेकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे सगळे प्रकरण संशयास्पद व गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले चौकशी करत आहेत.