हायलाइट्स:
- प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर
- सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची सतेज पाटील यांची माहिती
- बदनामीच्या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केलं जात आहे. या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल राज्याच्या गृहखात्याने घेतली असून याबाबत आपण सायबर सेलला चौकशीचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली. शनिवारी एक जानेवारी २०२२ रोजी ‘बुली बाई’ नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री पाटील यांनी सायबर सेलला कारवाई करण्यास सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाबाबत धागे दोरे हाती लागले आहेत, मात्र, तपास सुरू असल्याने आपण आताच काही बोलणार नाही. परंतु लवकरच याचा पर्दाफाश करू, असंही सतेज पाटील म्हणाले.
मुंबईत गुन्हा दाखल
महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुध्द मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सदर अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत, त्याबरोबर आक्षेपार्ह मजकूरही टाकण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्या फोटोंचा लिलाव केला जात आहे. यात एका महिला पत्रकाराचा फोटो अपलोड करण्यात आला असून आक्षेपार्ह मजकुरासह तो शेअर केला जात आहे. याबाबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.