हायलाइट्स:
- रेहम खान पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या पूर्व पत्नी
- पुतण्याच्या लग्नाहून परतताना गाडीवर गोळीबार
- गाडी बदलल्यानं गोळीबारात बचावल्याचा दावा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याचं समोर येतंय. खुद्द रेहम खान यांनी सोशल मीडियावर ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सोबतच, ‘हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान?’ असा प्रश्नही रेहम खान यांनी विचारला आहे.
काही अज्ञात लोकांकडून आपल्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचं रेहम खान यांनी म्हटलंय. आपल्या पुतण्याच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर रेहम खान आपल्या घरी परतत असताना हा हल्ला घडवून आणण्यात आला.
‘मी माझ्या पुतण्याच्या लग्नानंतर घरी परत जात असताना काही लोकांनी अचानक माझ्या गाडीवर गोळीबार केला. दोन मोटारसायकलस्वारांनी बंदुकीच्या जोरावर माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मी तत्काळ माझी गाडी बदलली. माझा सुरक्षा रक्षक आणि चालक गाडीतच उपस्थित होते’ असं रेहान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
सोबतच, ‘हाच इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान आहे का? भ्याड, लुटारू आणि लोभी लोकांच्या देशात आपलं स्वागत आहे’ असं म्हणत आपल्या पूर्व पतीवरही रेहान खान यांनी निशाणा साधलाय.
‘मला एखाद्या सामान्य पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे पाकिस्तानात जगायचं आणि मरायचंय. मग माझ्यावर भ्याड हल्ला होवो किंवा कायदा-सुव्यवस्था रस्त्यात चिंध्या उडवल्या जावोत. याची जबाबदारी या तथाकथित सरकारनं घ्यायला हवी. मी माझ्या देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे’ असंही रेहम खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
रेहम खान यांच्याकडून पूर्व पती आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर उघडपणे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी पाकिस्तानातील बलात्कारांची वाढती संख्या, महिलांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून इम्रान खानला यांच्यावर निशाणा साधला आहे.