नमुन्यांची वाढली गर्दी
गेल्या आठ दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आढळलेल्या आणि ओमिक्रॉन संशयित असलेल्या रुग्णांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. मात्र, तिथे विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या नमुन्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागपुरातील नमुन्यांची तपासणी व्हायला विलंब लागत आहे. या काळात ओमिक्रॉन बाधित रुग्ण असला तरी अहवाल येईपर्यंत तो बरा झालेला असतो, असा अनुभवही मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आला. मात्र, यात निष्काळजीपणा होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक रुग्ण ओमिक्रॉन बाधित आहे, असे समजून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.
प्रशासनाचा हायअलर्ट
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता नागपूर महापालिकेने हा संसर्ग होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. मनपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सर्व विदेशी प्रवाशांची चाचणी विमानतळावरच करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. ज्या प्रवाशांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात यावे, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. प्रवाशांच्या संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था मनपातर्फे सिव्हिल लाइन्स येथील आमदार निवास येथे करण्यात आली आहे. तसेच ज्यांना हॉटेलमध्ये राहायचे आहे, त्यांना हॉटेल अल-झम-झम आणि हॉटेल ओरिएंटल येथे स्वखर्चाने विलगीकरणात राहता येते, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.