अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खुद्द ऑस्टिन यांनीच ही माहिती दिलीय. आपल्या शरीरात करोना संसर्गाची हलकी लक्षणं आढळून आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, ऑस्टिन यांनी करोना लसीचे डोस पूर्ण केल्यानंतर ‘बुस्टर डोस‘ही घेतला होता. त्यानंतरही ते करोना संक्रमित आढळले आहेत.
ऑस्टिन यांनी रविवारी रात्री एका निवेदनाद्वारे आपल्या करोना संसर्गाची माहिती देत आपण विलगीकरणात राहत असल्याचं सांगितलं.
आपण राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि आपल्या टीमलाही यासंदर्भात माहिती दिल्याचं ऑस्टीन यांनी स्पष्ट केलंय. तसंच येत्या आठवड्यात ‘शक्य तितक्या’ जास्तीत जास्त बैठकांना ‘डिजिटल’ पद्धतीनं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
‘माझ्या कर्मचाऱ्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे’, असंही ६८ वर्षीय ऑस्टीन यांनी सांगितलंय.
लसीकरण पूर्ण केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आपण ‘बुस्टर डोस’ घेतल्याचं सांगतानाच ‘करोनाविरुद्ध लढण्यासाठी लस फायदेशीर ठरत’ असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच नागरिकांनाही ‘बुस्टर डोस’ घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.