हायलाइट्स:
- आमदार रोहित पवार यांनाही करोनाची लागण
- ट्वीट करत याबाबतची माहिती दिली
- संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करून घेण्याचं आवाहन
आमदार रोहित पवार यांनीच ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसंच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोना चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
‘तुमच्यासोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली,’ असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं आवाहनही आमदार पवार यांनी केलं आहे.
नगर जिल्ह्यातील अनेक नेते करोनाबाधित!
करोनाचा संसर्ग झालेल्या राजकीय नेते मंडळींमध्ये आणखी भर पडली आहे. मागील आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना करोनाची लागण झाली. तसंच मंत्री प्राजक्त तनपुरे हेदेखील करोनाच्या सापळ्यात अडकले होते. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आणि आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या नेतेमंडळींच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली आहे.