हायलाइट्स:

  • वीज मीटरमध्ये कायमचे सेटींग करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच
  • लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या दोघांना पकडण्यात आलं
  • वरिष्ठांकडेही यासंबंधी चौकशी करण्यात येणार

अहमदनगर : दरमहा वीज बील कमी यावे, यासाठी हॉटेलच्या वीज मीटरमध्ये कायमचे सेटींग करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या दोघांना पकडण्यात आलं आहे. यातील एक जण वायरमन असून दुसरा कंत्राटी मदतनीस आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कायमची व्यवस्था करून देतो, असं त्यांनी हॉटेलचालकाला सांगितलं होतं. त्यामुळे आता वरिष्ठांकडेही यासंबंधी चौकशी करण्यात येणार आहे. (वीज बिल बातम्या)

नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नगर-औरंगाबाद रोडवरील भेळसेंटरमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. तंत्रज्ञ बाळासाहेब पांडुरंग टिमकरे (वय ४३, रा. जेऊर बायजाबाईचे, नगर) व कंत्राटी मदतीस शिरीष रावसाहेब भिसे (वय ४५ रा. खोसपुरी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दोघे वीज वितरण कंपनीच्या जेऊर बायजाबाईचे सेक्शनमध्ये नोकरीला आहेत. शेवगाव तालुक्यातील हिंगणगावणे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे पांढरीपूल येथे हॉटेल आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही करोनाने गाठलं; ट्वीट करत दिली माहिती

हे दोघे कर्मचारी त्यांच्याकडे केले. तुमच्या हॉटेलचे विजेचे बिल कायमचे कमी येईल, अशी व्यवस्था करून देतो. उपकार्यकारी अभियंता कोपनर यांना सांगून हे काम करून देण्यासाठी त्यांनी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर हॉटेलचालकाने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळ्याची कारवाई सुरू केली. त्यासाठी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपींनी या कामासाठी ६० हजार रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं.

ही लाच पांढरीपूल येथील शिवलिला भेळ येथे सोमवारी (३ जानेवारी) सायंकाळी स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार पथकाने तिथं सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी तेथे आले आणि हॉटेलचालकाने लाचेची रक्कम दिली. कंत्राटी कर्मचारी भिसे याने ती स्वीकारून लगेच तंत्रज्ञ टिमकरे यांच्या हातात दिली. त्यावेळी पथकाने पुढे येत दोघांनाही पकडले. त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईत खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, रविंद्र निमसे, संध्या म्हस्के, राधा खेमनर, हरुन शेख, राहुल डोळसे यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here