Mother And Child Killed After Falling From Train Heartbreaking Incident In Nagpur | धावत्या ट्रेनमध्ये हात धुताना महिला चिमुकल्यासोबत पडली खाली, पती पाहण्यासाठी गेला अन्… | Maharashtra Times
नागपूर : धावत्या गाडीत भोजन झाल्यानंतर हात धुवायला वॉश बेसिनजवळ गेलेल्या महिलेचा तिच्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्यासह गाडीतून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतवारी- रिवा एक्स्प्रेसमध्ये तिरोडा- तुसमरदरम्यान रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. पूजा इशांत रामटेके (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे.
रामटेके कुटुंब नागपूरच्या कामठी मार्गावरील आवळेनगरातील रहिवासी आहे. इशांत रामटेके हे रिवा येथे लष्करी शाळेत शिक्षक आहेत. सध्या ते नागपूरला सुटीवर आले होते. २ तारखेला ते पत्नी व मुलासह रिवाला जाण्यासाठी निघाले. इतवारी रेल्वेस्थानकावरून सायंकाळी ६.३० वाजता रिवाला जाणारी गाडी सुटली. याच गाडीत ते थ्री टीअर एसी कोचमधून प्रवास करीत होते. इशांत यांनी पोलिसांना दिलेल्या बयाणानुसार, पूजाने गाडीतच मुलाला खाऊ घातले. त्यानंतर ती त्याचे तोंड धुण्यासाठी वॉश बेसिनकडे गेली. मात्र, बराच वेळ झाला तरी ती परतली नाही. त्यामुळे त्यांनी गाडीत सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कोठेच सापडले नाहीत. लॉकडाऊनच्या चर्चांमुळे पालक पुन्हा संभ्रमात, मुलांना शाळेत पाठवावे की नाही? गोंदियाला गाडी येताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहचून सारा प्रकार सांगितला. तोवर पूजा व तिचा मुलगा बेपत्ता होऊन दीड-दोन तास झाले होते. दरम्यान, आरपीएफला वैनगंगा नदीवरील पुलाच्या अँगलमध्ये एका महिलेचा, तर नदीच्या पात्रात छोट्या मुलाचा मृतदेह आढळला. ही माहिती गोंदिया लोहमार्ग ठाण्यात पोहचली त्यावेळी इशांत तेथेच होते. त्यामुळे त्यांना लगेच ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले. पत्नी व मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान, घटनास्थळ लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत येत नसल्याने हे प्रकरण करडी पोलिसांकडे सोपविण्यात आले.
प्रेमाचा दुर्दैवी अंत
नोकरीच्या निमित्ताने इशांत हे पत्नी व मुलासह रिवालाच राहायचे. दोन महिन्यांपूर्वी पूजा माहेरी आली होती. आता पुन्हा ते रिवाकडे निघाले होते. गड्डीगोदाम भागात राहणाऱ्या पूजा व इशांत यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सव्वा वर्षापूर्वी या दाम्पत्याला गोंडस बाळ झाले. पण, त्यांच्या प्रेमाची अशी दुर्दैवी अखेर झाली. या घटनेने आवळेनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.