मुंबई : मुंबई शहरातील ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय फक्त मुंबईपुरताच का ? ,असा प्रश्न उपस्थित करत मनसे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मुंबई प्रमाणेच औरंगाबाद शहरातील सुद्धा ५०० चौरस फूट क्षेत्रावर असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या मागणीसाठी मनसे बुधवारी रस्त्यावर उतरणार आहे.
औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औरंगाबाद शहरातील गुंठेवारी भागात लाखो नागरिक राहतात, त्यांच्या टॅक्समध्ये मनपाने अन्यायकारक वाढ केली आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर माफ झाला आहे,मग औरंगाबाद मधील नागरिकांवर अन्याय का?, त्यामुळे औरंगाबादमध्ये ६०० स्क्वेअर फुट क्षेत्र असलेल्या सर्वांना टॅक्स माफी मिळावी ह्या मागणीसाठी उदया बुधवारी औरंगाबाद महानगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
पाचशे चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुंबईने घेतला आहे. कर माफीची ही योजना हळूहळू सर्वच शहरात राबवली जाईल. इतकंच नाहीतर औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात देखील ही योजना राबवता येईल असे संकेत उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिले होते.