अमेरिकेच्या अलास्कातून एक हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर यतेय. हाडं गोठवणाऱ्या थंडीत अवघ्या एका दिवसाचं एक वेळेअगोदरच जन्माला आलेलं भ्रूण रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आलं. या बाळाच्या कपड्यांसोबत बाळाच्या आईनं आपल्या हातांनी लिहिलेलं एक पत्रंही आढळलंय. हे पत्र वाचल्यानंतर कुणाही सहृदय व्यक्तीचे डोळे पाझरू शकतात.
आई-वडील आपल्या पाल्यासाठी काहीही करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी, अधिक प्रेम मिळावं यासाठी त्यांची धडपड सुरू असते… हीच गोष्ट या पत्रातूनही स्पष्टपणे दिसून येतेय.
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित बाळाचा एक व्हिडिओ आणि पत्र व्हायरल झालंय.
एक दिवसाचं बाळ निर्जन स्थळी एका पुठ्ठ्याच्या पेटीत पत्रासह आढळून आलं. आईनं त्याच दिवशी बाळाला आपल्यापासून विलग केलं होतं ज्या दिवशी हे बाळ जन्माला आलं. ज्या वेळेस हे बाळ सापडलं तेव्हा या भागात १२ डिग्रीपेक्षाही कमी तापमान होतं.
‘न्यूयॉर्क पोस्ट’नं दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबर रोजी अवघं जग सेलिब्रेशनमध्ये दंग होतं, त्याच दिवशी हे भ्रूण बेवारस झालं होतं. आपल्यापासून तोडत असली तरी आई ती आईच… आपल्या बाळासाठी चांगल्या भविष्याची कामना करत तिनं या बाळाला रस्त्यावर सोडलं होतं, हे दुर्दैव!

आईचं हृदयद्रावक पत्र
‘अलास्का स्टेट ट्रुपर्स’कडून या बाळाची माहिती जाहीर करण्यात आली. त्यांनीच या बाळाला जवळच्याच ईएमएस रुग्णालयात दाखल केलं.
फेअरबँक्सच्या रहिवासी असलेल्या रोक्सी लेन यांना हे बाळ पहिल्यांदा आढळून आलं. बाळाजवळ आढळून आलेल्या पत्रात हे एका दिवसाचं बाळ वेळेअगोदर जन्माला आल्याचं (अकाली बाळ) नमूद करण्यात आलं होतं.
‘माझी मदत करा. माझा जन्म ३१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ६.०० वाजता झाला. मी निश्चित वेळेपेक्षा १२ आठवडे अगोदरच जन्माला आलो. मी झालो तेव्हा माझी आई २८ महिन्यांची गर्भवती होती. माझ्या आई-वडिलांकडे आणि आजी-आजोबांकडे मला भरवण्यासाठी आणि पालन-पोषणासाठी पैसे नाहीत. त्यांना माझ्यासोबत असं कधीही करायचं नव्हतं. माझी आई खूप दु:खी आहे. कृपया मला आपल्यासोबत घेऊन चला, त्यामुळे मलाही प्रेमळ कुटुंब मिळू शकेल. ही माझ्या आई-वडिलांची प्रार्थना आहे. माझं नाव तेशावन आहे’, असं या बाळासोबत आढळलेल्या पत्रात त्याच्या आईनं लिहून ठेवलंय.
मुलाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या लेन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘कदाचित या मुलाच्या आई-वडिलांना अलास्काच्या ‘सेफ हेवन लॉ’बद्दल माहीत नसावं. यानुसार, कोणत्याही पालकाला आपल्या मुलाला आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा नसेल तर त्याला जवळच्या रुग्णालयात पाठवू शकतात. किंवा एखाद्या चर्च, पोलीस स्टेशन किंवा फायर स्टेशनकडेही या बाळाला सोपवलं जाऊ शकतं’ असं म्हणतानाच आज एक जीव वाचवता आल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलंय.