हायलाइट्स:
- मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय
- टास्क फोर्स सदस्यांनी व्यक्त केली चिंता
- येत्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या १० हजारांपल्याड
- नागरिकांनी घाबरून न जाता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता
मुंबई आणि महाराष्ट्रातील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात संभाव्य तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही वेगाने वाढ होत आहे. मुंबईत ही संख्या अधिक आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेतली जात आहे. करोनासह ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि मुंबई महापालिका सज्ज आहे. असे असले तरी, चिंता वाढली आहे. कोविड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सावध इशारा दिला आहे. मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ आहे. सोमवारी करोना रुग्णांची संख्या आठ हजारांहून नोंदवण्यात आली आहे आणि लवकरच येत्या काही दिवसांत हा आकडा दहा हजारांहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे ट्विट जोशी यांनी केले आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असून, त्यांना रुग्णालयांत दाखल होण्याची आवश्यकता भासेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. जबाबदारीने करोना नियमांचे पालन करावे आणि दोन मास्क घालावेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अधिक काळजी आणि सतर्कता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी ट्विटमध्ये केले आहे.
मुंबईत शनिवारी ६, ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. ४५१ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. शुक्रवारी करोना रुग्णांचा आकडा ५, ६३१ इतका होता. यात शनिवारी १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात ९१७० नवीन रुग्णांचे निदान झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील मृत्युदर वाढला असून, तो २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शनिवारी १४४५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
…तर लॉकडाउन घोषित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही
राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. जर अशाच प्रकारे रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर राज्यात लॉकडाउन घोषित करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले होते. शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे, असेही ते म्हणाले. दुसरीकडे शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन लागू करण्याची तूर्तास शक्यता नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती बघता कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले होते.