हायलाइट्स:
- बुल्लीबाई प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
- मुंबई पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती
- मुख्य सूत्रधार महिला आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- बेंगळुरूतून ताब्यात घेतलेल्या तरूणाला केली अटक
बुल्लीबाई अॅपवर काही मुस्लीम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात रविवारी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने (मुंबई पोलिस सायबर सेल) अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे तपास सुरू केला होता. या प्रकरणात सोमवारी पोलिसांच्या पथकाने बेंगळुरूतून एका २१ वर्षीय तरूणाला ताब्यात घेतले होते. हा तरूण उच्चशिक्षित असून, इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. यानंतर मंगळवारीही पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आता आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बेंगळुरूतून ताब्यात घेतलेल्या २१ वर्षीय संशयित तरूणाची चौकशी करण्यात येत आहे. त्याला सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी पोलीस मुंबईत घेऊन आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेचे पोलीस उपायुक्तांकडून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बेंगळुरूतून ताब्यात घेतलेल्या संशयित तरूणाची ओळख अद्याप पोलिसांनी उघड केलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात दोषी असलेल्या अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, बेंगळुरूतून ताब्यात घेतलेल्या तरूणाची १० हून अधिक तासांपासून चौकशी करण्यात येत आहे. त्याची ओळख उघड झाली आहे. विशाल कुमार असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर आज उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलेली मुख्य संशयित आरोपी महिला ही उत्तराखंडची असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही संशयित आरोपी एकमेकांना ओळखतात, अशी माहितीही समोर आली आहे. बुल्लीबाई अॅपसंबंधित तीन अकाउंट मुख्य संशयित आरोपी महिलेकडून हाताळण्यात येत होते. तिचा सहकारी आरोपी विशाल कुमार याने एका वेगळ्याच नावाने अकाउंट उघडले होते. ३१ डिसेंबरला अकाउंटवरील नाव बदलण्यात आले, अशी माहितीही उघड झाली आहे.