Pune School Update: मुंबई, ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता पुण्यातल्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहील. मात्र या कालावधीत नववी, दहावीच्या मुलांना लसीकरण करण्यासाठी शाळा सुरू राहतील, असेही पवार म्हणाले.

राज्यात करोना संक्रमणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. करोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी राज्यातील वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्या मागोमाग ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेनेही हा निर्णय आपापल्या कार्यक्षेत्रात राबवत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मंगळवारी दुपारी पनवेल महानगरपालिका हद्दीतल्या शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्याच निर्णय घोषित झाला. या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू राहणार आहेत.

कॉलेजांचा निर्णय बुधवारी

कॉलेजबाबत तसेच अन्य निर्बंधांबाबत बुधवारी ५ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेऊन संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय जाहीर करणार, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे महापालिकेने १६ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील बहुतांश खासगी शाळांनी नाताळच्या सुट्टीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून अनेक शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग गजबजले. या शाळांमध्ये दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले. शाळांनीही दोन सत्रात शाळा भरवून एका वर्गातील विद्यार्थी या दोन सत्रांमध्ये विभागले आहेत. तसेच, जे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यातील शाळा बंद केल्या जाव्यात, असा आग्रह पालकांकडून धरला जात होता. याबाबत काही पालकांनी महापौरांना निवेदन दिले होते.

मुंबईतल्या पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
शिक्षकांकडून शाळेतूनच ऑनलाइन वर्ग, विद्यार्थ्यांविना भरली शाळा
शाळांनी कसे करावे विद्यार्थ्यांचे लसीकरण…शिक्षणमंत्री म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here