हायलाइट्स:
- वाहनधारकांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी
- ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा पूल आठ महिन्यांसाठी बंद
- वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात
ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, नाशिक या ठिकाणांवरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी वाहनचालक ठाणे येथील कोपरी पुलाचा वापर करतात. याआधी जुन्या पुलावरून ही संपूर्ण वाहतूक होत होती. त्यानंतर एमएमआरडीएकडून नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आणि वाढती वाहतूक कोंडी पाहता तीन महिन्यांपूर्वी हा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र ठाण्यातील जुना कोपरी पूल जीर्ण झाला होता. भविष्यात कुठलाही अपघात किंवा दुर्घटना होऊ नये यासाठी हा जुना कोपरी पूल बंद करून नवीन कोपरी पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी कोपरी येथील सर्व्हिस रोडचा वापर करण्यात येणार आहे.
प्लास्टिकचे आवरण असलेला बुके वापरला म्हणून केडीएमसी उपयुक्तांवर दंडात्मक कारवाई
जुन्या कोपरी पुलाचे एमएमआरडीएच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून हा पूल आजपासून बंद करण्यात येणार आहे. हा पूल ठाणे आणि मुंबईला जोडणारा असल्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु हा जुना कोपरी पूल जीर्ण झाला असल्यामुळे त्याचे नुतनीकरण आणि दुरुस्ती करून नवीन पुलाच्या आराखड्याप्रमाणे तयार होणार आहे. रेल्वे आणि एमएमआरडीएकडून गर्डर येऊन पडले आहेत. त्यामुळे येत्या ८ महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पुलावरून होणारी वाहतूक ही नवीन पुलामार्गे वळवण्यात आली आहे; तसेच या ठिकाणी कुठलीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून १०० वॉर्डन नेमण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तीन हात नाका आणि कोपरी पूल परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. २४ तास पोलीस बंदोबस्त ठेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.