सहसा रस्त्यावर न दिसणारे प्राणी अचानक नजरेस पडले तर… अर्थातच, कुणीही आनंदून जाईल… तसंच या प्राण्यांना किंवा पक्षांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही लगेचच स्पर्धा सुरू होईल. अशीच एक घटना चीनमध्ये घडलीय.
चीनच्या एका एक्सप्रेस-वेवर गाड्यांची रांग लागलेली असतानाच एक शहामृग रस्त्याच्या मधोमध तुफान वेगानं धावताना आणि गाड्यांशी स्पर्धा करताना अनेकांच्या नजरेस पडला. मग काय या धावत्या शहामृगाला अनेकांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी लाभली.
असाच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं आपल्या गाडीतूनच या शहामृगाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडिओ पाहून हा विशालकाय पक्षी घाबरलेल्या अवस्थेत असल्याचंही तुमच्या लक्षात येऊ शकेल.
‘पीपल्स डेली, चायना’नं या दुर्मिळ घटनेचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस : सोमवारी उत्तर चीनमधील रोंगचेंग – वुहाई एक्सप्रेस-वेवर एक शहामृग धावताना दिसला. शहामृगाला गाडीतून चुकीनं उतरवणाऱ्या चालकाकडे तो थोड्या वेळाने परत गेला’, अशी माहितीही या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये दिली गेलीय. ‘बिचारा पक्षी, किती घाबरलाय’, असं या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या एका युझरनं म्हटलंय.
हत्तींच्या कळपाचा १७ महिन्यांचा प्रवास
रस्त्यावर जंगली प्राणी पाहून नागरिकांना धक्का बसण्याची चीनमध्ये ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही, दक्षिण चीनमधील युनान इथं हत्तींचा कळप रस्ता चुकला होता. हे हत्ती तब्बल १७ महिने भटकत होते, तसंच त्यांच्यामुळे मानवी वस्तीत हाहा:कार उडाला होता. या १४ हत्तींनी जवळपास ५०० किलोमीटर प्रवास करून ७ कोटी ८२ लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान केलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, या हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी तब्बल ४०० आपत्कालीन कर्मचारी, १२० वाहनं आणि ड्रोनचा एक थवाच तैनात करण्यात आला होता. हत्तींच्या कळपाच्या प्रमुखाची दिशाभूल झाल्यानं कदाचित संपूर्ण समूह वणवण फिरत राहिल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं होतं.
चीन हा जगातील एकमेव देश आहे जिथे हत्तींची संख्या वाढताना दिसून येतेय. संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे आणि शिकार बंदीमुळे, युनान प्रांतातील हत्तींची संख्या १९९० मध्ये १९३ होती, ती आज ३०० वर पोहचलीय.