हायलाइट्स:
- आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार
- फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- गुन्हा दाखल झाल्याने पडळकर बंधू अडचणीत
या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७, रा. झरे) यांनी फिर्याद दिली आहे. पडळकर बंधूंनी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वाघमारे यांनी केली आहे.
महादेव वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार, आटपाडी तालुक्यातील झरे येथे त्यांच्या मालकीची गट नंबर ६२४, ५५६ आणि ५५७ ही जमीन आहे. ही जमीन खरेदी करण्याची तयारी ब्रह्मदेव पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांनी दाखवली. वाघमारे आणि पडळकर यांच्यामध्ये ६ लाख २० हजार रुपयांत जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. पडळकर बंधूंनी २१ मार्च २०११ मध्ये जमीन खरेदीचा दस्त करून घेतला होता. त्यावेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून वाघमारे यांना १ लाख ६० हजार रुपये दिले.
उर्वरित रक्कम नंतर तीन ते चार महिन्यात देण्याचे ठरले होते. त्यानंतर अनेक वर्षे उलटली तरी अजूनही पडळकर बंधूंनी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उर्वरित ४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर वाघमारे यांनी मंगळवारी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.