हायलाइट्स:

  • सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ
  • मुख्यमंत्र्यांनीही वाहिली श्रद्धांजली
  • शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधूताईंच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर सिंधुताई सपकाळ)

‘सिंधूताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म अन् पोटासाठी वणवण; सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास

सिंधूताई सपकाळ यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती भावुक आठवण!

सिंधूताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावं यासाठीचे त्यांचं योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधूताईंच्या कार्यावर भाष्य केलं आहे. दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

दरम्यान, सिंधूताई सपकाळ यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here