कोल्हापूर : कर्नाटकी गुळाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला गोळी मारण्याची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने बाजार समितीला केली. बंदुकीची भाषा बोलणाऱ्या व्यापाऱ्याने, आमच्या हातात गुळाचे फावडे आहे हे लक्षात ठेवावं, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

साखर मिश्रीत कर्नाटक गुळाची कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. या गुळावर ‘कोल्हापूर गूळ’ असा शिक्का मारुन व्यापारी विक्री करतात असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. बाजार समितीत आवक होणाऱ्या कर्नाटकी गुळाबाबत बाजार समितीत कोणतीच नोंद ठेवली जात नसल्याने व्यापारी कोल्हापूर गूळ म्हणून परराज्यात पाठवतात. त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या ब्रॅन्डला धक्का बसत असल्याने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारला असता एका व्यापाऱ्याने ‘माझ्याजवळ बंदूक आहे’ अशी धमकी दिली.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

या घटनेनंतर शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली. बाजार समिती प्रशासनाकडून या घटनेकडे कानाडोळा केला जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेने बाजार समितीवर मोर्चा काढला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपप्रमुख सुजित चव्हाण यांनी बाजार समितीतील अशासकीय संचालक मंडळाला जाब विचारला. जिल्ह्यात फक्त पाच ते सहा महिने गुऱ्हाळघरे सुरू असताना कर्नाटकातून बारमाही गुळाची आवक कशी होती, असा प्रश्न उपस्थित केला. कर्नाटकातील गुळाचा सौदा काढला जात नसल्याने समितीचे उत्पन्न बुडत असतानाही कोणीच बोलत नसल्याबद्दल शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

कर्नाटकी गुळाबद्दल जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला धमकी देणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. तसंच त्या व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा, अशी बाजार समितीने प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार करावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here