औरंगाबाद : एसटीच्या विलिनीकरणासाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांच्या विरोधात निलंबनासह बदलीची कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात निलंबित करण्यात आलेल्या आणखी १२ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई सुरू असताना, मंगळवारी ५० कर्मचारी कामावर रूजू झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
आतापर्यंत संप सोडून एसटीच्या कर्तव्यावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८५० वर पोहोचली आहे. या कर्मचाऱ्यांमुळे मंगळवारी तब्बल १०८ बसद्वारे ३३७ फेऱ्या करण्यात आल्याने पाच हजार ८९५ प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाचा लाभ घेतला. पुणे मार्गावर १५ तर, नाशिक मार्गावर सात शिवशाही बस चालवण्यात आल्या आहेत. या सुरू असलेल्या एसटी बसमधुन ५८९५ प्रवाशांनी प्रवास केला.