औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन शिफ्टमध्ये करोना चाचण्या सुरू केल्या आहेत. सकाळी दहा ते रात्री दहादरम्यान चाचण्या केल्या जात आहेत; त्याशिवाय हाय रिस्क कॉन्टॅक्ट शोधण्यासाठी पाच मोबाइल टीम्स नियुक्त करण्यात आल्या आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली.

औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या रोज वाढतच आहे. सोमवारी ३६ रुग्ण होते, मंगळवारी ही संख्या ८७वर पोहोचली. वाढत्या संख्येबद्दल डॉ. मंडलेचा यांना विचारले असता ते म्हणाले, ‘औरंगाबाद शहरात ओमिक्रॉनबाधित दोन रुग्ण आढळले होते, आता त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले आहे. ते दोघेही अन्य कुणाच्याही संपर्कात आलेले नव्हते, त्यामुळे तशी काळजी नाही; परंतु नागरिकांकडून नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसत नाही. मास्क न घालणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. गर्दीत जाण्याचे टाळा, असे आवाहन केलेले असतानादेखील नागरिक ते ऐकत नाहीत, गर्दीत जातात. त्यामुळे गेल्या काही दिवसात करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
सिंधूताईंच्या निधनाने मुख्यमंत्री भावुक; सांगितली ‘ती’ आठवण!
महापालिकेने आरटी-पीसीआर व अँटिजेन चाचण्यांच्या प्रमाणातदेखील वाढ केली आहे. रोज सरासरी २४०० ते २६०० चाचण्या केल्या जात आहेत. सध्या दोन शिफ्टमध्ये हे काम केले जात आहे. सकाळी दहा ते रात्री दहा असे बारा तास करोना चाचण्या केल्या जात आहेत. ज्या व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्या व्यक्तींच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी पाच फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. ज्या व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांच्या लाळेचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. आतापर्यंतच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात औंरगाबादमधील दोनच व्यक्ती ओमिक्रॉनबाधित आढळळून आल्या, त्या व्यक्तीदेखील बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत, असा उल्लेख डॉ. मंडलेचा यांनी केला.
गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म अन् पोटासाठी वणवण; सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here