हायलाइट्स:

  • रायगडमध्ये मंगळवारी एकाच दिवशी सातशेहून अधिक करोना रुग्ण
  • महाड तालुक्यातील शाळेत करोनाचा शिरकाव
  • १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना करोनाचा संसर्ग
  • सर्वांची प्रकृती स्थिर , कोणतीही लक्षणे नाहीत

महाड: राज्यात करोना (Corona) आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron) चे रुग्ण वाढत आहेत. रायगडमध्ये गेल्या २४ तासांत ७०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाड तालुक्यातील एका शाळेतही करोनाचा शिरकाव झाला आहे. या शाळेतील १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि तालुक्याचे आरोग्य प्रशासन हादरले आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला होता. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्याला करोनाचा विळखा बसला आहे. मंगळवारी, करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. जिल्ह्यात ७०२ करोना रुग्ण आढळून आले. त्यातील ५२१ रुग्ण एकट्या पनवेलमधील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. असं असतानाच, रायगडमधील महाड तालुक्यातील एका शाळेतही करोनानं शिरकाव केल्याने धास्ती वाढली आहे. महाडमधील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

रायगड जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; पनवेलमध्ये धडकी भरवणारी परिस्थिती, २४ तासांत ५२१ रुग्णांची नोंद
मुंबई, ठाण्यानंतर आता पनवेलमधील शाळाही पुढील आदेशापर्यंत बंद

या शाळेतील १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशा १७ जणांना करोना संसर्ग झाला आहे. या शाळेतील एका विद्यार्थ्याला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. त्यात एकूण १७ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोणामध्येही लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्व जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, शाळांमध्ये विद्यार्थी बाधित होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. सर्वांनी अधिक काळजी आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. करोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा विस्फोट! राज्यातील आज 18 हजार 466 नवे कोरोनाबाधित

सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण २३८ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातून हा अहवाल समोर आला. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. ‘साधारण शनिवारी एका पालकाने कळवले की मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या केल्या. १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात दोन शिक्षक आहेत. शाळा तातडीने बंद केली आहे. शाळेत सॅनिटायझेशन करण्यात आले आहे, अशी माहिती शाळेचे चेअरमन मंदार माने यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here