हायलाइट्स:
- मुंबईसह राज्यभरात मंगळवारी करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळाली होती
- त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार, या चर्चांना ऊत आला होता
- गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १८४६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मंगळवारी करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार, या चर्चांना ऊत आला होता. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १८४६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर २० जणांचा मृ्त्यू झाला. यापूर्वी सोमवारी नव्या करोना रुग्णांची संख्या तब्बल १२ हजार इतकी होती. मात्र, एकाच दिवसात नव्या करोना रुग्णांची संख्या आठ हजाराने वाढली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनचा धडकी भरवणारा आकडा
मुंबईसह राज्यात ओमायक्रॉनच्या (ओमिक्रॉन) रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आज राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या मुंबईतच ४० जणांना संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १०८६० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनाचा डबलिंग रेट अवघ्या ११० दिवसांवर आला आहे. काल हाच डबलिंग रेट १८३ दिवसांचा होता. तर मुंबईतील करोना रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे.
मुंबईत सध्या ४७,४७६ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरुन ९२ टक्क्यांवर आले आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ६५४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.