
सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेजस्विनीने सिंधुताईंचे काही फोटो शेअर करत लिहिलं, ‘अनेकांनी विचारलं तू अजून काही लिहिलं का नाहीस.. आपण माणसाला सोशल मीडियावरून किती पटकन जज करतो. पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिती खरंच असते का? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे. रात्री ममता ताईच्या फोनवरून बातमी खरी आहे कळल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. मन सुन्न झालं. माझ्या प्रतिक्रियेसाठी खूपवेळ फोन वाजत होता. काही जड अंतःकरणाने उचलले, काही नाही उचलता आले. कारण ती वेळ खरंच नाजूक होती.’
तेजस्विनीने पुढे लिहिलं, ‘माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता बाळा म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या.’

‘मला त्या कायम म्हणायच्या ‘मी हे आयुष्य जगले, पण तू मला जिवंत केलंस!’ अभिनेत्री म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे ही ओळख मला ‘मी सिंधुताई सपकाळ‘ चित्रपटाने दिली. कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.
KBC च्या मंचावर सिंधूताईंनी सांगितलेला हृदयद्रावक अनुभव
लोकांना एक विनंती करत ती म्हणाली, ‘घाई घाई ने RIP लिहिण्याच्या या जगात, त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. यातून बाहेर पडण्याची संधी द्या.’ तेजस्विनीची तब्येत बरी नसल्याने ती अंत्यदर्शनासाठी गेली नाही. माईंच्या आत्म्यास शांती लाभो आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदनच्या कुटुंबाला या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो, अशी प्राथना तिने या पोस्टद्वारे केली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीड महिन्यांपूर्वी सिंधुताईंना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सिंधुताईंचं हृदयविकाराचा झटक्याने निधन झालं. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) ठोसरपागा येथे महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर अनेक कलाकारंनी श्रद्धांजली वाहिली.
तू बाहेर ये! कार्तिकच्या घराबाहेर तरुणींचा गोंधळ, नंतर असं काही झालं की…