हायलाइट्स:
- रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा विळखा वाढतोय
- दापोली येथील कृषी महाविद्यालयात करोनाचा शिरकाव
- १० विद्यार्थ्यांना करोना संसर्ग
- खबरदारी घेण्याची आवश्यकता
दापोली येथे एकूण १३७ विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट दापोली तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री ४० विद्यार्थ्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी सात विद्यार्थी पॉझिटिव्ह आले, तर आज बुधवारी ९७ विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी तीन जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती दापोली तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या १० विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सौम्य लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून, सात जणांना एनसीसी कॅम्पसाठी सहभाग घ्यायचा असल्याने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील स्वतंत्र इमारतीमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून संबंधित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस ऑनलाइन क्लासेस सुरू राहणार आहेत. तशा सूचना सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर यांनी दिल्या आहेत. १० जानेवारीनंतर पुन्हा टेस्ट करण्यात येतील, अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय बुधवारी होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली होती. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान या कृषी महाविद्यालयाच्या सिंधुदुर्ग वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्राथमिक लक्षणे दिसताच कोणती काळजी घेण्यात आली होती? मास्क व सॅनिटायझर वापर व्यवस्था वसतिगृहात उपलब्ध होती का? आदी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times