हायलाइट्स:
- भडकावू आणि चिथावणीखोर भाषण
- कालीचरण महाराज याला एका दिवसाची पोलीस कोठडी
- न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांचा आदेश
कालीचरण महाराज याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारा आहे. या गुन्ह्यात आरोपीने चिथावणीखोर भाषण करण्यामागे कोणत्या व्यक्ती अथवा संघटना यांचा सहभाग आहे, याबाबत सखोल तपास करायचा आहे. गुन्हा घडल्यावर फरार कालावधीत आरोपी कालीचरणने कोठे वास्तव्य केले, तो कोणाच्या संपर्कात होता, याबाबत तपास करायचा आहे. या गुन्ह्यातील सहआरोपी मिलिंद एकबोटे, मोहन शेटे, कॅप्टन दिगेंद्र कुमार, दीपक नागपुरे अद्याप फरार असून, त्याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. त्याचबरोबर आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत, त्यासाठी कालीचरण महाराज याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
न्यायालयाने कालीचरण महाराज याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कालीचरण महाराज याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात कालीचरण महाराज याला पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून आज ताब्यात घेतलं होतं. पुण्यातील शिवप्रताप दिन कार्यक्रमात समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल आहे.