२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनाच जिल्हाध्यक्षपद देण्याचं नियोजन पक्षाने केलं होतं, मात्र पक्षातीलच काही नेत्यांनी उमेश पाटील यांना विरोध केल्यामुळे काका साठे यांची तयारी नसतानाही जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला समाधानकारक यश मिळालं,
बळीराम साठे यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केल्याने त्यांना जिल्ह्यात फिरणे शक्य होत नाही. त्यातच आता त्यांची तब्येतही साथ देत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट त्यांच्याकडून हे पद काढण्यासाठी धडपड करत होता. त्यात माजी जिल्हाध्यक्ष आघाडीवर असल्याची चर्चा होती. आपल्या तक्रारी केल्या जात आहेत, पण जोपर्यंत मोठे साहेब सांगणार नाहीत,तोपर्यंत मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी साठे यांनी बोलूनही दाखवली होती. मात्र आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाला जिल्ह्यात सर्वत्र फिरणारा जिल्हाध्यक्ष आवश्यक असल्याची चर्चा होती. त्याबरोबरच सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीची सर्व जुळवाजुळव करण्यासाठी नवा चेहरा राष्ट्रवादीला अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान, पक्षातील ही खदखद लक्षात आल्यावर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. मात्र साठे यांचा हा राजीनामा पक्षनेतृत्व स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.