Coronavirus Cases In Maharashtra Today Live In Aurangabad 610 Patients Tested Positive In Five Days | ‘या’ जिल्ह्याने चिंता वाढवली, फक्त ५ दिवसांत करोना रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर | Maharashtra Times
औरंगाबाद : मराठवाड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, गेल्या पाच दिवसांतच विभागात तब्बल ६१० करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ उस्माबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात रुग्णवाढ सुरूच आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मराठवाड्यात सलग चार महिन्यांपासून करोना रुग्णांची दैनंदिन संख्या शंभरीच्या आत होती; परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. त्यात औरंगाबाद १८ व लातूर मध्ये प्रत्येकी १८ रुग्णांचा समोवश होता. तर २ जानेवारीला विभागात नव्याने १०८ रुग्णांची यात भर पडली. तर ३ जानेवारीला आणखी नव्याने १११ रुग्णांची भर पडली आहे. तर ४ जानेवारीला ८९ आणि पाच जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत नव्याने २४६ रुग्ण आढळून आले आहेत. अशा प्रकारे पाच दिवसांत एकूण ६१० रुग्ण आढळून आले आहेत. यात प्रामुख्याने औरंगाबाद पाठोपाठ लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक आहे. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत असून गेल्या पाच दिवसांत एकट्या औरंगाबादेत २१९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत यात आणखी १२० बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यावर आरोग्याचे संकट कोसळेल, नागपूर खंडपीठाची सरकारवर नाराजी विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेत जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
दुसऱ्या लाटेत अशी होती परिस्थिती
एक मार्च २०२१ रोजी विभागातील ८ जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण करोनाग्रस्त होते. १६ मार्च रोजी हा आकडा २ हजार ६०० पर्यंत गेला होता. शहरी भागात १ हजार ४४२, तर ग्रामीणमध्ये १ हजार १५८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यातच होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची संख्या वाढली होती.