औरंगाबाद जिल्ह्यातही प्रशासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत बुधवारी ५० हून अधिकजण उपस्थित होते. पंचायत समितीच्या विलासराव देशमुख सभागृहात बैठक झाली. करोना नियमाचे पालन करण्यासाठी बैठकीच्या सुरवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश गटणे यांनी ज्या विभागाचे दोनपेक्षा अधिक प्रतिनिधी असतील त्यांनी सभागृहाबाहेर जावे असे सांगितले. त्यास प्रतिसाद देत दोन विभागाचे प्रतिनिधी सभागृहाबाहेर पडले. सभागृहात काही जणांनी मास्क घातलेले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘निम्म्या क्षमतेने केवळ ५ दिवस बँका सुरू ठेवा’
बँकांमध्ये काम करणारे अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित होऊ नयेत आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून बँकेचे ग्राहक हे बाधित होऊ नयेत म्हणून ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या वतीने वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेत केवळ निम्मे मनुष्यबळ कार्यरत असावे, सर्वच बँका आठवड्याचे पाच दिवस दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवाव्यात, तसेच बँकांमधील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात यावा आदी सूचनांचा त्यात समावेश करण्यात यावा, असेही ‘यूएफबीयू’चे समन्वयक देविदास तुळजापूरकर यांच्या सहीनिशी बुधवारी (५ जानेवारी) काढण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.