हायलाइट्स:
- मुंबईत करोनाचे रुग्ण वाढताहेत
- संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका
- मुंबईसाठी सकारात्मक बातमी
- १ कोटी नागरिकांना लशीचा पहिला डोस
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक बातमी समोर आली असून मुंबईत १ कोटी नागरिकांना लशीची पहिली मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण १०८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लशीच्या दोन्ही मात्रा मिळून आतापर्यंत मुंबईत एकूण १ कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना संरक्षण देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली, तेव्हा मुंबईतील १८ वर्षांपुढील एकूण ९२ लाख ३६ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य पालिकेने निर्धारित केले होते. त्यातुलनेत मुंबईत बुधवारी सायंकाळपर्यंत १ कोटी १७ हजार नागरिकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली. हे प्रमाण पालिकेच्या लक्ष्याच्या १०८ टक्के एवढे आहे.
तर लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ८१ लाख ७६ हजार इतकी झाली आहे. त्यातून पालिकेने १८ वर्षांपुढील ८८ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. दरम्यान मुंबईत ३ जानेवारीपासून मंगळवारपर्यंत १५ ते १८ वयोगटातील २३,९४२ मुलांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर बुधवारी ८,८३२ मुलांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली.