हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक
- भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे
- राष्ट्रवादी काँग्रेसने केली चौकशीची मागणी
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे ही गंभीर बाब- मलिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्यावरून मोठे वादळ उठले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते, असा दावा करत भाजपने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात तपासाची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली आहे. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकारचे पोलीस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल, असे नवाब मलिक म्हणाले. केंद्र सरकार व राज्य सरकार चौकशी करेल त्यावेळी संशयाला वाव निर्माण होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.