हायलाइट्स:
- घराजवळ पेटवलेल्या शेकोडीत होरपळून महिलेचा मृत्यू
- अंगावरील कपड्यांनी अचानक घेतला पेट
- प्राथमिक उपचारानंतर सांगलीतील रुग्णालयात सुरू होते उपचार
- रत्नागिरीच्या चिपळूणमधील दुर्दैवी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे ही घटना घडली. शेकोटीजवळ उभ्या असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. उज्ज्वला देवळेकर (वय ४२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, थंडी असल्याने शेकोटी पेटवून बाजूलाच महिला बसली होती. त्याचवेळी अचानक तिच्या अंगावरील गाऊनने पेट घेतला. यात ही महिला भाजली. उज्ज्वला यांना तातडीने सांगली येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे रुग्णालयात उपचार सुरू असताना, तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अलोरे, शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, २२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ शेकोटी पेटवण्यात आली होती. शेकोटीजवळ बसलेल्या महिलेच्या अंगावरील गाऊनने अचानक पेट घेतला. यात त्या ८० टक्के भाजल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेजल हिने चिपळूण येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केल्यानंतर पुढील तपासासाठी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times