हायलाइट्स:
- मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
- मुंबई शहरात मिनी लॉकडाउन लागू होण्याची शक्यता
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले संकेत
- लवकरच नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता
मुंबईत करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. आता करोना रुग्णांचा आकडा २० हजारांपल्याड पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील परिस्थितीची माहिती दिली. संपूर्ण लॉकडाउन लागू करणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, कठोर निर्बंध अर्थात मिनी लॉकडाउन लावला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. नवीन निर्बंधांबाबतची नियमावली आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन, मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. रुग्णालयांतील उपलब्ध खाटांबाबत त्यांनी माहिती दिली. महापालिकेने २२ हजार खाटा आणि ७ हजार आयसीयू बेड्स सज्ज ठेवले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी ३६,२६५ नवीन करोना रुग्ण आढळले. तर एकट्या मुंबईत करोना रुग्णांची संख्या २०, १८१ इतकी होती. गुरुवारपर्यंत मुंबईत करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ही ७९२६० इतकी आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचे राज्यात काल ७९ नवीन रुग्ण आढळले. यातील सर्वाधिक ५७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण मुंबईतील आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ७, नागपूर ६, पुणे महापालिका क्षेत्रात ५, पुणे ग्रामीण भागात ५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ८७६ रुग्ण आढळले आहेत.