डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झपाट्याने रुग्ण वाढल्याने केंद्राने चिंता व्यक्त केली. राज्यात २१ डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत ६१ हजार ८८८ रुग्णांची नोंद झाली आहे. ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, बृहन्मुंबई या जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. २७ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, नागपूर, पालघर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे केंद्राने म्हटले आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने राज्याला ऑक्सिजनयुक्त, अतिदक्षता विभागातील खाटांची क्षमता वाढवण्याचे; तसेच आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याऐवजी आतापासूनच आरोग्य सुविधा सज्ज ठेवाव्यात, असेही निर्देश दिले आहेत. बहुतांश रुग्णांची लक्षणे सौम्य असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवा आणि त्यांच्यावर दररोज लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड, हिंगोली, नगर, नाशिक, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली आहे.
केंद्राच्या राज्याला सूचना
– बाधित रुग्ण आढळणाऱ्या कंटेन्मेंट झोनवर लक्ष ठेवा.
– रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम वाढवा.
– टेलिमेडिसीनद्वारे रुग्णांशी संवाद साधा.
– बाधितांच्या संपर्कातील सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करा.
– खासगी आरोग्य सेवाही सज्ज ठेवा.
– ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट, ‘एन ९५’ मास्कचा वापर करा.