हायलाइट्स:
- उल्हासनगरमध्ये केनियातून परतले कुटुंब
- आरटीपीसीआर केल्यानंतर कुटुंब फिरायला काश्मीरला गेले
- रिपोर्ट आल्यानंतर उडाली खळबळ
- तिघांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये केनियामधून एक कुटुंब काही दिवसांपूर्वी परतले होते. त्यांनतर कुटुंबातील सदस्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत या सदस्यांनी घरात राहणे किंवा शहरात थांबणे अनिवार्य होते. मात्र, ते कुटुंब घरात न थांबता काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे फिरायला गेले. सहलीवरून येईपर्यंत या कुटुंबातील चार सदस्यांचा चाचणी अहवाल आला. त्यापैकी तिघांना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यासाठी गेले. पण ते कुटुंब सहलीसाठी गेल्याचे समजले. त्यामुळे खळबळ उडाली.
दरम्यान ३१ डिसेंबर रोजी उल्हासनगरला हे कुटुंब पुन्हा घरी आले. करोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना, कुटुंब बेजबाबदारपणे वागले. करोना नियमांचे पालन त्यांच्याकडून झाले नाही. त्यामुळे उल्हासनगर पालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कुटुंबाच्या प्रमुखाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
केनियामधून उल्हासनगरमध्ये कुटुंब आले होते. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र, ते तरीही घरी न थांबता फिरायला गेले होते. सरकारने घालून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने कुटुंब प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.