पंतप्रधान मोदी त्यांच्या ताफ्यासह निघाले आहेत आणि दुसरीकडे ट्रॅक्टरसह अनेक लोक त्यांना घेरण्यासाठी त्याच फ्लायओव्हरकडे जाऊ लागले आहेत. फ्लायओव्हरवर लोकांनी पीएम मोदींना चारही बाजूंनी घेरले आहे, असे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
‘हा अॅनिमेटेड व्हिडिओ खलिस्तानवाद्यांनी एक वर्षापूर्वी यूट्यूबवर टाकला होता. यामध्ये पंतप्रधान मोदींना बोगस शेतकऱ्यांनी उड्डाणपुलावर रोखलंय, घेराव घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातोय. या व्हिडीओत आहे नेमका तसाच प्रयत्न पंजाबमध्ये करण्यात आला आहे, असे दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा म्हणाले. त्यांनी ट्विटसोबत या व्हिडिओची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे.
‘फिर देखेंगे – किसान एकता जिंदाबाद, पंजाबी जीटीए व्हिडिओ २०२०, धक्का गेमिंग’ या शीर्षकासह १ डिसेंबर २०२० ला यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ धक्का गेमिंग यूट्यूब चॅनेलद्वारे अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३५ हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. ७७६ जणांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. धक्का गेमिंगनेच ६ डिसेंबर २०२० ला दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्येही पीएम मोदींना निदर्शकांनी घेरल्याचे दाखवण्यात आले आहे. ५ जानेवारीला हे अॅनिमेटेड व्हिडीओ खूप चालल्याचे बोलले जात आहे. त्याच दिवशी भटिंडा येथील उड्डाणपुलावर आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला होता.
तपासासाठी गृह मंत्रालयाचे पथक फिरोजपूरला पोहोचले
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ५ जानेवारीला पीएम मोदींचा ताफा १५ ते २० मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर रोखण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाचे एक पथक फिरोजपूरला पोहोचले आहे. या समितीने पंजाबचे पोलीस महासंचालक एस. चट्टोपाध्याय आणि इतर १२ हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचं सूत्रांनी सांगितले.