पुण्याहून गावाकडे आलेल्या तरुणासह त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून गावकरी व कुटुंबामध्ये शुक्रवारी जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत, कुटुंबातील तिघांसह पाच जण जखमी झाले आहेत. पुण्याहून आलेला तरुण व त्याच्या कुटुंबातील दोघे, अशा तिघांना गंभीर दुखापत झाली आहे.
तालुक्यातील सोनवाडी बुद्रुक येथील समीर अन्वर सय्यद हे पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे. ते समीर दहा मार्च रोजी सोनवाडी येथे परत आले. ते शुक्रवारी गावातील एका किराणा दुकानात सामना खरेदीसाठी गेले असता गावातील काही तरुणांनी, ‘तुला व तुझ्या कुटुंबातील काही व्यक्तीना करोना झाला आहे. तुम्ही घराबाहेर येऊ नका’, असे बजावले. त्यावरून समीर व गावातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर समीरचे आई वडील, भाऊ व बहीण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर समीरचे कुटुंब व गावकऱ्यांमध्ये लाठ्या-काठ्या व लोखंडी गजाने जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी समीर सय्यद, अन्वर सय्यद व शबनूर अफरोज शेख या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times