हायलाइट्स:
- अंबरनाथमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची तरूणाला मारहाण
- कारमधून आलेल्या तिघांनी केली मारहाण, धमकावले
- अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार
- अंबरनाथ गाव परिसरात घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथच्या पालेगाव-जुन्या अंबरनाथ गाव परिसरात राज देशेकर हा वास्तव्याला आहे. राज हा याच परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांच्याकडे इंटरनेट विभागात काम करतो. दुपारच्या सुमारास राज हा त्याच्या ऑफिसबाहेर उभा असताना शिवसेनेचे उपविभागप्रमुख निशांत पाटील यांच्यासह राजू पाटील आणि स्वप्नील निळजेकर हे तिघे कारमधून तिथे आले आणि त्यांनी रॉडने राज देशेकर याला मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर राज याने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्याआधारे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या सगळ्याबाबत निशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. तर निशांत यांच्या भावाला विचारले असता, गुरुवारी रात्रीच्या सुमारास निशांत यांचा भाऊ घरी जात असताना राज देशेकर हा वाहनाला आडवा आला आणि त्यावरून शिवीगाळ करत हुज्जत घातल्याचा आरोप निशांत यांच्या भावाने केला. त्यावरूनच दुसऱ्या दिवशी निशांत पाटील यांनी राज देशेकर याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
काय घडलं नेमकं?
पालेगाव-जुन्या अंबरनाथ परिसरात भरदुपारी रस्त्यावर कारमधून तिघे जण आले. त्यांनी राज याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज रस्त्यावर उभा असताना पांढऱ्या रंगाची कार आली. भरधाव आलेली कार अचानक थांबली. या कारमधून तिघे जण खाली उतरले. त्यांनी सुरुवातीला राजला धक्का दिला. त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने त्याच्या पायावर मारले. राज रस्त्याच्या पलीकडे गेला. त्या ठिकाणी काही महिला आल्या. त्यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे राज बचावला.