हायलाइट्स:
- मुंबईत वीकेंड लॉकडाउन लावणार का?
- महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं उत्तर
- सध्या तरी मुंबईत वीकेंड लॉकडाउनचा विचार नाही
- किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांच्या टीकेला दिले उत्तर
मुंबईतील वाढत्या करोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना, सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याचवेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत लॉकडाउन अथवा वीकेंड लॉकडाउन लागू करण्यासंबंधीच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईत वीकेंड लॉकडाउन सध्या तरी लावण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. नागरिकांमध्ये करोना परिस्थिती आणि लॉकडाउनची भीती आम्ही नाही तर, विरोधक निर्माण करत आहेत, असे त्या म्हणाल्या. मुंबईच्या महापौर पेडणेकर या आज, शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना उत्तर दिले.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘मुंबईत दैनंदिन २० हजार रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी १७ हजार रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आणि काहींमध्ये तर लक्षणेच नाहीत. सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे, यात कुणीही आयसीयूमध्ये दाखल नाही. संकट काहीही असो, आम्ही घाबरत नाही. महापालिकेची पूर्ण तयारी आहे.’ सध्या तरी लॉकडाउन लागू करण्यात येणार नाही. मुंबईत दैनंदिन २० हजार रुग्ण सापडतील त्यावेळी लॉकडाउन लागू करण्यात येईल, असे मी म्हणाले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. जम्बो कोविड सेंटरमध्ये २५०० खाटा उपलब्ध आहेत. या सेंटरमधील आयसीयूमध्ये एकही रुग्ण नाही. बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत. त्यामुळे सध्या तरी वीकेंड लॉकडाउन लागू करण्यात येणार नाही, असे त्या म्हणाल्या.