हायलाइट्स:
- भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून धमकी
- भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका
- मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच असल्याची टीका
- हे सरकार तालिबान्यांच्या हाती सोपवलं आहे का? वाघ यांचा सवाल
आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून आता भाजपने राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘भाजपचे नेते आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोनवरून विखारी भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इतके तास उलटूनही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा सुस्त आहेत,’ असे त्या म्हणाल्या. राज्यातील महत्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्य सरकार तालिबान्यांच्या हातात दिले आहे का, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
एकीकडे मुख्यमंत्री हे हॉलिडे मूडमध्ये आहेत, तर गृहमंत्री अद्याप वीकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत. राज्यात सरकार नावाची गोष्ट उरली आहे का? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार पार्टटाइम काम करत आहे. शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणाऱ्यांच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळा, शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही झाले तर, त्याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असतील हे लक्षात ठेवावे, असेही वाघ म्हणाल्या.
मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
भाजपचे नेते आशिष शेलार यांना फोनवरून धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून शेलार यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. याचा तपास करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.