हायलाइट्स:

  • करोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका
  • महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या ४०,९२५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात करोनाची तिसरी लाट पीक पॉईंटला जाईल. मात्र, याच महिन्याच्या शेवटापासून करोनाची तिसरी लाट ओसरायला लागेल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ४८ तासांत दुप्पट होत आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग शिगेला पोहोचेल. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटपासून किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करोना रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या ४०,९२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, आज राज्यात एकूण २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २०९७१ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ८ लाख ७२ हजार ७३० इतकी झाली आहे.

करोना लस न घेतलेल्या लोकांसाठी तिसरी लाट धोकायदायक

करोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याचे संकेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले. इक्बाल चहल यांनी सध्या मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असे आहेत की, ज्यांनी करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे साहजिकच ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे इक्बाल चहल यांनी सांगितले.
रुग्णसंख्येनुसार लॉकडाउन नाही; रिक्त खाटा,ऑक्सिजनची निकड पाहून पालिका घेणार निर्णय
निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील: टोपे

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यादृष्टीने आरोग्य खाते आणि टास्क फोर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात निर्बंध लागू करायचे नाही, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. करोना विषाणूचे संक्रमण थांबायला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रकारच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांशी चर्चा करत असतात. टास्क फोर्स, आरोग्य सचिव आणि मीदेखील मुख्यमंत्र्यांना करोना परिस्थितीची माहिती दिली आहे. या सर्व माहितीवर सारासार विचार करुन मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here