हायलाइट्स:
- रत्नागिरीतील उसगाव येथील मंदिरात चोरी
- मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने रोकड केली लंपास
- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले
- आरोपी गावातीलच, चौकशीत दिली गुन्ह्याची कबुली
मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उसगावातील श्री खंडोबा म्हाळसाई मंदिरात चोरी झाली होती. ४ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. पोलिसांनी तपास करून संशयित आरोपीला जेरबंद केले.
याबाबत दत्ताराम लक्ष्मण सावरकर यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही उसगावच्या या मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, चोरट्याचा शोध लागू शकला नव्हता. प्रभारी निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी आणि त्यांच्या पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या परिसरातून गोपनीय माहिती मिळवली. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताचा फोटो मिळवून त्याच्याबाबत उसगाव ग्रामस्थांकडून माहिती मिळवली. संशयित चोरटा हा गावातील असल्याचे उघड झाले. राजेंद्र धोपट (वय ५५) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
रोकड हस्तगत
संशयित चोरट्याला अटक करून त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तत्पूर्वी, संशयित आरोपीकडून ८,३५६ रूपये हस्तगत केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ व त्यांचे सहकारी आर. बी. मोहिते, एस. आर. शिंदे, महिला पोलीस नाईक आर. एन. डोले, एस. बी. कांबळे, जानवलवकर, कोळथरकर, देशमुख यांनी केली. चोरीच्या घटनेच्या तपासात दाभोळ पोलिसांना उसगावचे सरपंच चेतन रामाणे व ग्रामस्थांनी सहकार्य केले.