हायलाइट्स:
- ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे सध्या मुंबईत करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे
- प्रशासनाकडून १८ वर्षांवरील नागरिकांच्याच मोठ्याप्रमाणावर चाचण्या होत आहेत
२० डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात १ ते १० या वयोगटातील करोनाबाधित मुलांची संख्या फक्त २,६२० इतकी आहे. याच काळात मुंबईत तब्बल १.४ लाख नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. याचा अर्थ एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. तर ११ ते २० वयोगटातील ८,९३५ मुलांना याच काळात करोनाची लागण झाली. मात्र, प्रत्यक्षात मुंबईतील डॉक्टर्सकडून ऑनलाईन कन्सल्टेशन किंवा इतर ठिकाणी यापेक्षा कितीतरी अधिक मुलांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. लहान मुलांमध्ये लक्षणे गंभीर असल्याशिवाय किंवा घरातील एखादा सदस्य कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याशिवाय आम्ही त्यांची करोना चाचणी करायला सांगत नाही, ही बाब अनेक बालरोगतज्ज्ञांनी मान्य केली आहे.
लहान मुलांना ताप येण्याच्या प्रमाणात वाढ
बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुल पारेख यांच्या माहितीनुसार, करोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या घाटकोपरमधील दवाखान्यात दिवसाला साधारण १२ ते २० लहान मुलांना उपचारासाठी आणले जात होते. मात्र, गेल्या आठवडाभरात हा आकडा ६० वर जाऊन पोहोचला आहे. या लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, थंडी आणि ताप ही लक्षणे आढळून येत आहेत. ताप आलेल्या ८० टक्के मुलांची कोव्हिड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. बकुल पारेख यांनी दिली.
मुंबईत आजपासूनच नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता
राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात आजपासूनच तातडीने नवे करोना निर्बंध लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन दिवसांत आरोग्य खाते, टास्क फोर्स आणि विविध यंत्रणांशी सविस्तर चर्चा केली आहे. या सगळ्यांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे मुख्यमंत्री राज्यात नवे करोना निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. राज्यातील रुग्णवाढीचा वेग प्रचंड असल्याने तातडीने निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्यामुळे विकेंड सुरु होण्यापूर्वी म्हणजे आजपासूनच राज्य सरकार महाराष्ट्रात नवे करोना निर्बंध लागू करणार का, हे पाहावे लागेल.