हायलाइट्स:
- आलिशान चार चाकी वाहनांची चोरी
- कोल्हापूर पोलिसांनी आरोपींना केली अटक
- ३१ अलिशान कार जप्त
देशपातळीवरचा गुन्हा उघडकीस आणल्याने पथकातील पोलिसांना ३५ हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. विशेष म्हणजे या टोळीचा प्रमुख आकाश देसाई हा कारागृहातून ही टोळी चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशपातळीवर आलिशान कार चोरणारी टोळी सक्रीय आहे. या टोळीचे धागेदोरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार रामचंद्र कोळी यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी अनेक पथके तयार करत या टोळीचा शोध घेतला. विविध ठिकाणी सापळा रचून त्यांनी जहीर अब्बास दुकानदार, यश देसाई, खलिदमहंमद सारवान यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता, त्यांनी विविध राज्यातून ३१ चारचाकी वाहन चोरल्याचं स्पष्ट झालं. चोरीची वाहने ते नंबर प्लेट, चेस नंबर बदलून विकत होते.
आकाश देसाई हा या टोळीचा प्रमुख आहे. तो बेळगाव येथील कारागृहात आहे. कारागृहात राहून तो टोळी चालवत होता. त्यालाही या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे.
दरम्यान, या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी उपनिरीक्षक शेष मोरे, असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव, संजय पडवळ, अनिल पास्ते, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी एक महिनाभर पाठपुरावा केला.