हायलाइट्स:

  • मुंबईसह राज्यात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने राज्यात कठोर निर्बंध लागू होणार, हे सरकारने अगोदरच स्पष्ट केले होते
  • लहान व्यापाऱ्यांच्या पोटात लॉकडाऊनच्या भीतीने गोळा आला होता

मुंबई : करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असल्याने लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले होते. तर दुसरीकडे मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने त्याच्याशी संबंधित रोजगारांवर गदा आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन करोनाच्या तिसऱ्या लाटेवेळी निर्बंध लादताना ठाकरे सरकारने या दोन्ही घटकांना काहीसा दिलासा दिला आहे. मुंबईसह राज्यात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने राज्यात कठोर निर्बंध लागू होणार, हे सरकारने अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या पोटात लॉकडाऊनच्या भीतीने गोळा आला होता. मात्र, शनिवारी रात्री जाहीर केलेल्या नव्या निर्बंधांपासून दुकानांना दूर ठेवण्यात आले आहे. तसेच मॉल्सही ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत.

गेल्या लॉकडाऊनवेळी राज्यातील प्रार्थनास्थळे विशेषत: मंदिरे बंद असल्याने भाजपने महाविकासआघाडी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यामुळे यावेळी ठाकरे सरकारने धार्मिक स्थळांनाही निर्बंधांच्या कक्षेपासून दूर ठेवले आहे. मात्र, आगामी काळात परिस्थिती न सुधारल्यास निर्बंध आणखी कठोर केले जातील, असा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री राज्य सरकारकडून नवे निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात अखेर रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच दिवसभर जमावबंदीही लागू असेल. त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. तर जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. तर मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.
Maharashtra Mini Lockdown : दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; कसं असेल राज्यातलं मिनी लॉकडाऊन!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील जनतेला साद

वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. करोनाचे दूत होऊन इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका. आपल्याला कोणाचीही रोजीरोटी बंद करायची नाही. पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करु नका. तुम्ही स्वत:चं आरोग्य चांगलं ठेवाल पण इतरांचे आरोग्य धोक्यात येईल, असे वर्तन होऊ नये. त्यामुळे नियम धुडकावणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here