हायलाइट्स:
- गेल्या ४८ तासांत करोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे
- करोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला
सध्या मुंबईत डॉक्टर्स, बेस्ट कर्मचारी आणि पोलिसांना मोठ्याप्रमाणावर करोनाची लागण होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबई पोलीस दलांतील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. सध्याच्या घडीला पोलीस दलातील तब्बल ४०० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने ५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले होते. तसेच गेल्या ४८ तासांत करोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.
राज्यात करोनाचा उद्रेक, ४१ हजारांचा टप्पा ओलांडला, मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्णवाढ
देशातील करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात ४१,४३४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये १००९ ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा समावेश आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील सक्रिय करोना रुग्णांचा आकडा १,७३, २३८ वर जाऊन पोहोचला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ ही मुंबईत नोंदवली गेली आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्णवाढ झाली. एकट्या मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत २०,३१८ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. तर पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २४७१ जणांना करोनाची लागण झाली. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात पुण्यात ७११ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता ११५०० इतका झाला आहे.