सोलापूर : राज्यातील ठाकरे सरकारमध्ये आमदारही समाधानी नाहीत, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो. अशातच सांगोल्याचे शहाजी पाटील यांनी केलेल्या एका भाषणामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून पाटील यांनी आपल्याच पक्षावर ताशेरे ओढले आहेत.

शहाजी पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी आमदार झालो असं सांगताना निवडणुकीत भाजपची खूप मदत झाल्याचं त्यांनी उघड केलं आहे. ते पंढरपूर येथील डॉ. बी. पी. रोंगे हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन समारंभात शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या तुफान फटकेबाजीमुळे चांगलीच रंगत आली. मात्र त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला आणि आघाडी सरकारलाच चिमटे काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाल्याचं सांगताना या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर २४ तास लक्ष होते, सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे, असं शहाजी पाटील यांनी सांगितलं. तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचं गुपित पाटील यांनी उघड केले. मात्र निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडून गप लांब बसायचं, गडबड करायची नाही अशी तंबीही मिळाली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसंच या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करेन, असं वाटत नाही असं सांगताना ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशा शब्दात स्वतःच्याच पक्षाला त्यांनी टोले लगावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here