हायलाइट्स:
- नोटीस मागे घेण्यासाठी साडे पाच लाख रुपयांची लाच
- प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडले
- महसूल विभागात खळबळ
राधानगरी तालुक्यातील फराळे या गावाच्या हद्दीत तक्रारदार व्यक्तीचा स्टोन क्रेशरचा व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे प्रदूषण तसंच रस्ता खराब होत असल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस सरपंच डवर याने दिली होती. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनीदेखील अशाच प्रकारची नोटीस दिली. ही नोटीस मागे घेण्यासाठी सरपंच डवर याने ११ लाख रुपये लाच मागितली. यातील एक लाख स्वतःसाठी व दहा लाख रुपये प्रांताधिकारी प्रधान यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानुसार दुपारी डवर हा कोल्हापुरातील शासकीय मध्यवर्ती कार्यालयात आला. त्याने तक्रारदाराकडून साडेपाच लाख रुपये घेतले. यातील पाच लाख रुपये प्रांताधिकारी प्रधान यांना तर स्वतःसाठी ५० हजार रुपये घेतले. उर्वरित रक्कम नंतर देण्याची कबुली तक्रारदाराने दिली.
दरम्यान, याबाबत तक्रारदाराने पूर्वीच लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.