सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आंबा उत्पादनाचे नुकसान होऊ नये म्हणून आंबा वाहतूकदारांना आंबा वाहतुकीचे पास देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या अन्य नाशवंत कृषी उत्पादनाच्या वाहतुकीस देखील निर्बंधातून वगळण्यात आले आहे. यासाठी खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. आंबा उत्पादकांना आंबा वाहतुकीसाठी आता तहसीलदार कार्यालयातूनच आवश्यक पास मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. त्यामुळे करोनाच्या कचाट्यातून आंब्याची सुटका झाल्याचे दिसत आहे.
नडगिवे गावात आरोग्य पथक तैनात
कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून आरोग्य खात्याने या गावात कडेकोट यंत्रणा राबवली आहे. १९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक या भागात तैनात करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालाकडून १० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे दहाही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या खबरदारीचा व तयारीचा आढावा पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines